भारत-चीन सीमेवर पुन्हा संघर्ष

Foto
घुसखोरीचा डाव उधळला
भारतीय सैन्यांकडून सडेतोड उत्तर
भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नाही. मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचे चीनकडून उल्‍लंघन होत असल्याचे पाहायला पुन्हा एकदा मिळाले. गलवान खोर्‍यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
चीनने भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोर्‍यानंतर चीनने आपले सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केले होते. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्याने ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सैन्याने तयार केलेल्या सहमतीच्या शर्तींचं उल्लंघन करत पूर्व लडाखच्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने चिनी सैन्यांना पांगोंग आणि पांगोंग लेक क्षेत्रात प्रवेश करणार्‍या चीन सैन्याचा डाव उधळून लावला आहे. सध्या तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि शांतता पूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी जूनमध्ये (15 जून) भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोर्‍यात जोरदार झटापट झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा यासाठी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे सैनिक भिडल्याचे वृत्त आले आहे. यामुळे सीमेवरील तणाव अजूनही कमी झालेला नसल्याचे स्पष्ट होत असून चिनी सैन्य पूर्व लडाखमधून मागे हटायला तयार नसल्याचेही समोर येत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker